माईंची जीवन यात्रा
Video साठी येथे क्लिक करा https://youtu.be/ODBdukTHcE8
1920चे दशक हे स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्यासाने भारलेले असे दशक होते. देशातील कानाकोपरा जुलमी इंग्रजी राजवट उलथवून टाकण्याचा यथाशक्ती प्रयत्न करीत होता. ठाणे जिल्ह्यातील बोर्डी गावही यास अपवाद नव्हते. या गावातील अनेकांनी गांधीजीच्या सत्याग्रहांना पाठींबा देत तुरूंगवास भोगला होता. 21 ऑगस्ट 1926 रोजी याच बोर्डी गावातील एका सुसंस्कारीत सावे कुटुंबात माईंचा जन्म झाला. त्याकाळी इंग्रजांनी आपल्या कारकीर्दीत हैदोस घातला होता. माईंचे वडील तिर्थस्वरूप कै. आत्मारामपंत सावे हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. स्व. आत्मारामपंत सावे हे बी.ए.बी.टी. ही पदवी संपादन केलेले होते. तेव्हा मुंबईत LIC मध्ये ते मोठ्या हुद्द्यावर ऑफीसर होते. त्याच काळात माईंचे परमपूज्य गुरुवर्य आचार्य भिसे गुरुजी यांच्या सांगण्यावरून आत्मारामपंतांनी LIC मधील नोकरी सोडली आणि शिक्षणाच्या महान कार्याने प्रेरीत होऊन व त्या काळी शिक्षणाची असलेली गरज व स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन बोर्डी येथे सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूलची स्थापना केली व याच शाळेत माईंनी आपल्या शालेय शिक्षणाची सुरुवात केली. शालेय शिक्षण घेणारी ही परकर-पोलक्यातली छोटीशी कळीही वडिलांच्या संस्कारीत व देशभक्तीपर विचारांनी प्रेरीत झाली होती. शालेय जीवनामध्ये एक बुध्दीमान विदयार्थीनी असा त्यांचा लौकिक होता. वक्तृत्व, क्रीडा व अभ्यास या क्षेत्रांमध्ये पारितोषिके पटकावली होती. त्यावेळी खरे तर शिक्षणाचे महत्व लोकांना पटले नव्हते. तो काळ देशभक्तीने पेटून उठणा-या क्रांतीकारकांचा व स्वातंत्र्यसेनानींचा होता. बोर्डी या गावात तर घराघरात स्वातंत्र्यसेनानी होते. त्यामुळे घरातील संस्कारक्षम वातावरण व त्याला पूरक असा आजुबाजूचा परिसर या वातावरणात माईंचे बालपणीचे जीवन देशकार्यासाठी समृध्द होत गेले. त्यावेळी घरोघरी येणा-या वर्तमानपत्रावर बंदी होती. तेव्हा ''बुलेटीन्स'' म्हणजे पत्रके यायची. या पत्रकात प्रभातफेरी केव्हा निघणार इत्यादि पूर्ण दिवसाचा देशहिताचा कार्यक्रम असायचा. ही पत्रके रेल्वेतून यायची. त्यांच्या गावात ''चाफावाडी'' म्हणून आळी होती, येथे चाफा खूप फुलायचा. पूर्ण गावाला या चाफ्याचा सुगंध प्राप्त झालेला असायचा. बुलेटीन्सच्या पेट्या या चाफावाडीतील चाफ्याच्या झाडाखाली गुपचूप खड्डे खणून लपवल्या जायच्या. ही पत्रके घराघरात देताना कोणी दिसले तर त्यांच्या पायावर इंग्रज अमानुषपणे फटके मारायचे. पण ही भीती मनात असतानाही हे गांधीजींचे महान कार्य आहे व ते आपण करायलाच पाहिजे, या क्रांतीकारी विचाराने माईंचे मन पेटून उठायचे. माई लहान म्हणजे अगदी दहा-बारा वर्षांच्या असताना त्यांच्या सारख्याच आणखी मुलींसोबत पहाटे अगदी लवकर उठून ही बुलेटीन्स लोकांच्या खिडकीतून घराघरात टाकून येत. देशात काय चालले आहे याची कल्पना लोकांना यावी यासाठी केलेल्या या कार्यातूनच देशहितार्थ कार्यात आपला खारीचा वाटा उचलण्यास माईंनी सुरूवात केली. त्यांच्या वडिलांनी इतक्या लहानपणापासून समाजसेवेचे बाळकडू आपल्या मुलीला पाजले व त्यांच्या परिणितीतून माईचे समृध्द जीवन फुलत गेले. शालेय शिक्षण पूर्ण करून माईंनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी स्त्री एवढे शिक्षण घेतच नव्हती. पण माईंच्या वडिलांचा पिंडच मुळी शिक्षणाच्या दिव्य हेतूने प्रेरीत झालेला होता. त्यामुळे आपल्या मुलीने खूप शिकले पाहिजे व त्याचा उपयोग समाजाच्या, देशाच्या हितासाठी झाला पाहिजे, असेच त्यांना वाटे. आणि अशीच शिकवण नानांनी आपल्या मुलीला लहानपणापासूनच दिली होती. वडिलांच्या संस्कारक्षम मातीतूनच माईंसारखे सहीष्णू व निगर्वी शिल्प समाजाला मिळाले. कॉलेजचे पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर अगदी समज येते न येते तोच वयाच्या 19व्या वर्षी माईंना चांगले स्थळ आले. परमपूज्य थोर नेते कै. अण्णासाहेब वर्तक व नानासाहेब हे फार जवळचे मित्र. या दोघांनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात बरोबरीने तुरूंगवास भोगला होता. 1944 साली परमपूजनीय अण्णासाहेबांचे दुसरे चिरंजीव नरसिंह उर्फ भाईसाहेब यांच्याशी माईंचा विवाह ठरला आणि हजारो एकर जमीन असणा-या मोठ्या जमीनदार घराण्याची गृहलक्ष्मी म्हणून माईंनी विरारच्या थोर वर्तक घराण्याच्या उंब-याचे माप ओलांडले व वर्तक वाड्यात संसाराची सुरूवात केली. अत्यंत समजूतदार, कर्मठ व देशकार्यात स्वतःला वाहून घेतलेले असे अण्णासाहेबांचे कुटूंब. अण्णासाहेबांना सहा मुलगे. त्यांच्या पत्नी म्हणजे माईंच्या सासुबाई स्व. अन्नपूर्णाबाई म्हणजे या सर्व सुनांच्या आईच ! त्यामुळे प्रेम, पैसा, ऐश्वर्य व संस्कार कशाचीही कमतरता नव्हती. माई आपल्या संसारात पूर्णपणे रममाण झाल्या. लता, निलिमा व विकास ह्या फुलांची बरसात विधात्याने माईंच्या ओटीत केली. सुख चोहीकडून ओसंडून वाहत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 1953 साली परमपूज्य अण्णासाहेबांच्या आकस्मित निधनाने दुःखाची काळी छाया या कुटूंबावर पडली. हे कुटंब हतबल झाले व त्यानंतर अवघ्या सातच दिवसात माईंचे आदरणीय श्रध्दास्थान त्यांचे वडील नानासाहेब यांनीही या जगाचा निरोप घेतला. मन स्तब्ध करणारे सुन्न करणारे वातावरण घरात पसरले. सुखाच्या खळाळत्या चांदण्याला अचानक संकटांच्या अमावस्येने घेरले. या बिकट परिस्थितीचा माईंनी खंबीरपणे सामना केला. अण्णासाहेबांचे घर म्हणजे त्याकाळी सामाजिक व राजकीय चळवळींचे केंद्र होते. वडिलांनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र व माईंचे वडील दीर पद्मश्री व महाराष्ट्राचे थोर नेते भाऊसाहेब वर्तक यांनी ही धुरा यशस्वीपणे सांभाळण्यास सुरुवात केली. त्यावेळी माईंचे पती भाईसाहेब यांनीही कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी तितक्याच निर्भयपणे उचलली. पण शेवटी 'सुखस्य अनंतरम् दुःख | दुःखस्य अनंतरम् सुख | न नित्यम् लभते दुःख | न नित्यम् लभते् सुख ||' या सुभाषिताप्रमाणे कोमेजलेल्या वेलीवर नुकतीच सुखाची हिरवळ दिसत असतानाच नियतीने भाईसाहेबांवर हल्ला केला व त्यांना एका असाध्य रोगाने ग्रासले. कौंटुबिक जबाबदारी, मुलांचे संगोपन आणि आता पतीचे आजारपण या चक्रात माई पुरत्या गुरफटल्या गेल्या. पण त्यावेळीही इतक्या लहान वयात तितक्याच निष्ठेने, प्रेमाने व कर्तव्य तत्परतेने पतीची सेवा करण्यात त्यांनी जराही कसूर केली नाही. तारामाईंच्या व्यक्तीमत्त्वात असलेल्या सहनशिलता, संयमी व निश्चयी स्वभावाचा अवर्णनीय असा समतोलपणा या जोरावर तेथेही माई डगमगल्या नाहीत. पतीचा असाध्य आजार पाहूनही माईंनी आपल्या दुःखाचा कधी बाऊ केला नाही. त्या कधी कोमेजून गेल्या नाहीत. दुःख पचविण्याची व दुःखावर मात करण्याची जबरदस्त ताकद व इच्छाशक्ती माईसाहेबांकडे होती. ज्या आजारी अवस्थेत आपली पत्नी पूर्ण वेळ आपल्या जवळ असावी असे कोणत्याही पतीला वाटले असते, परंतु भाईसाहेबांचे समाजाप्रती तळमळ असलेले मन स्वस्थ राहीले नाही. त्यांनी स्वतःहूनच माईंना समाजकार्यांत झोकून देण्यासाठी प्रवृत्त केले. आपल्या दुःखाची पुसटशी कल्पनाही लोकांना न येऊ देता माईंनी समाजसेवेचे खडतर व्रत अंगिकारले. समाजकार्यात उतरल्यानंतर मात्र माई समाजाच्याच झाल्या. त्यांच्या सुखात त्या हरवल्या तर दुःखीतांच्या दुःखात त्या विरघळून गेल्या. वडिलांचे आदर्श संस्कार, अगदी लहान वयापासूनच गांधीवादी विचारसरणीचा मनावर झालेला परिणाम व तितकेच आदर्श विचारांचे नावाजलेले सासर या त्रिवेणी संगमातून माईंच्या जीवन रुपी कळीची एकेक पाकळी हळूहळू उमलू लागली. समाजसेवेचा ध्यास घेऊन ताराबाईंनी घराचा उंबरठा ओलांडला व प्रथम महिलांसाठी कार्यप्रेरीत होऊन येथील ग्रामीण व आदिवासी महिलांना न्याय मिळवून द्यावा या तीव्र इच्छेपोटी माईंनी विरार येथे वनिता विहार मंडळाची स्थापना केली. तेव्हा विरारमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन फार लांबून पाणी आणण्याशिवाय गत्यंतर नव्हते. महिलांना होणारा हा त्रास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. विरार येथील पापडखिंड तलाव खोदून तेथे धरण बांधले व विरारमध्ये पाणी आणले. आजही हे धरण विरारला पाणीपुरवठा करीत आहे. माईंनी गरीब - श्रीमंत असा भेद आपल्या उभ्या आयुष्यात कधीच केला नाही. आपल्या 'वनिता विहार महिला मंडळाची' स्थापना झाल्यावर सुखवस्तू महिलांबरोबरच ग्रामीण भागातील गरीब, अशिक्षित आदिवासी महिलांच्या समस्या सोडविण्यावर नेहमीच विशेष भर दिला. माई सकाळी फार लवकर उठायच्या. मुलांचे हवं नको पाहून, घरातील जमेल तेवढे काम आवरुन, आपल्या आजारी पतीची निष्ठेने सेवा करून व घरातून निघताना इतर सर्व सूचना नोकरांना देऊनच बाहेर पडायच्या. अशा परिस्थितीतही माई सदैव कार्यतत्पर व हसतमुख राहिल्या. इतक्या घाईच्या, गडबडीच्या दैनंदिनीतही आलेल्या पाहुण्यांचे स्वागत त्या तितक्याच आनंदाने व उत्साहाने करायच्या ! माई प्रथमपासूनच अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. अगदी सर्व कामातून वेळ काढून व्रतवैकल्य, उपवास व देवाची पूजा या सर्वात त्यांनी उभ्या आयुष्यात कधी खंड पडू दिला नाही. अगदी मंत्रीपदापर्यंत पोचलेल्या माईंनी कोणत्याही सबबीखाली श्रावण महिना पाळण्यात खंड पाडला नाही. माई या सेवेचे मूर्तीमंत प्रतिकच होत्या. निरपेक्ष सेवा करून समाजमनावर अधिराज्य गाजवले. महिलांचे, मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी वेळ-काळाचे भान न राखता आपल्या घराचा दरवाजा नेहमीच उघडा ठेवला. अपंगांचे, अंध मुलांचे दुःख त्यांना सतत बोचत होते. या मुलांनाही मानाने जगता यावे, त्यांच्यात जगण्याची नवी उमेद व जिद्द निर्माण व्हावी या महत् विचाराने माईंनी डहाणू येथे 1980 साली मूक-बधीरांसाठी शाळा काढली. तेथे त्या जातीने लक्ष घालत. आजही ही शाळा डहाणू येथे उभी आहे. आपल्या अजोड कार्याचे फलीत म्हणून त्या 1962 साली विरारच्या सरपंच झाल्या व नंतर 1972 साली जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या. माईंचे दीर थोर नेते भाऊसाहेब यांनी त्यांना समाजकार्याचे धडे देऊन वेळोवेळी प्रोत्साहन दिले. माईंच्या प्रगतीपथावरील वाटचालीमध्ये भाऊसाहेबांसारखे कुशल प्रशासक व त्यांचे नेतृत्व व मार्गदर्शन तारामाईंना सातत्याने लाभले. ठाणे जिल्हा परिषदेला तारामाईंच्या रुपाने एक खंबीर नेतृत्व मिळाले. याकाळात माईंकडे आरोग्य व अर्थ खात्याची जबाबदारी आली व त्या सभापती झाल्या. याच कालावधीत माई जिल्हा महिला मंडळाच्या अध्यक्षा झाल्या. याच काळात श्रीमती अनुताई वाघ यांच्यासारख्या निष्ठावंत व सेवाभावी समाजसेविकेबरोबर आदिवासी विभागामध्ये कार्य करण्याची संधी माईंना मिळाली. महिलांच्या कामासाठी जीवाचे रान करून फिरणा-या त्यावेळच्या ज्येष्ठ समाजसेविका ताराबाई मोडक यांच्याशी याच काळात माईंचा संपर्क आला व त्यांच्याबरोबर महिलांच्या समस्यांविषयी, प्रश्नाविषयी विचारविनिमय करुन काम करण्याची संधी माईंना मिळाली. 1972 साली महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या प्रथम महिला जिल्हा परिषद अध्यक्षा होण्याचा मान त्यांना मिळाला. यानंतर माई अगदी तळागाळातील आदीवासी भगीनींच्या व समाजाच्या माईच झाल्या, माईंनी या काळात मोखाडा, डहाणू, वाडा, कोसबाड, वसई-विरार या विभागातील आदिवासी भाग अक्षरशः पिंजून काढला. शेतकरी व आदिवासींच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी माईंनी अनेक विविध योजना आखल्या व त्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून राज्यशासनाकडून आर्थिक साहाय्य मंजूर करुन घेतले. या समाजातील गरीबीचा अत्यंत दूरदृष्टीने विचार करून माईंनी कुटुंबनियोजन योजना यशस्वीपणे राबवली. 1973 व 1975 साली कुटुंबनियोजनाच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल महाराष्ट्र सरकारतर्फे तारामाईंना सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या ''आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थे''च्या अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर, विरार शाळेची 1956साली इयत्ता आठवीच्या वर्गाची सुरूवात झाली. शाळेची अडचण दूर करण्यासाठी त्यांनी वर्षभर विनावेतन अध्यापनाचे काम केले. डिसेंबर 1977 ते जानेवारी 1978 या काळात माध्यमिक शिक्षकांनी चोपन्न दिवसांचा राज्यव्यापी संप केला होता. त्यावेळी संस्थाचालक असूनही माईंनी या संपाला सहानुभूती दर्शवली होती. ''शिक्षक हे नोकर नव्हेत'' असा विचार त्यांनी केवळ व्यक्तच केला नाही तर त्याप्रमाणे त्या शिक्षकांशी वागतही असत. 1978 साली आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेच्या अघ्यक्षा झाल्या. 1976साली राष्ट्रीय पातळीवर महिला अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षा पंतप्रधान माननीय इंदिरा गांधी यांनी तारामाईंचा जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून गौरवपूर्ण उल्लेख करून सत्कार केला होता. 1980 मध्ये माई विधानसभेच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या व बहुमताने माईंची विधानसभेवर निवड झाली. माई सार्वजनिक बांधकाम, समाजकल्याण, फलोत्पादन व परिवहन या खात्यांच्या राज्यमंत्री झाल्या. 1981 साली नेदरलँड, नॉर्वे, स्विडन यासारख्या देशांतील समाजकल्याण योजनांचा अभ्यास करण्यासाठी युरोपमध्ये प्रवास करण्याची संधी माईसाहेबांना मिळाली. डहाणू पासून बोरीवलीपर्यंत तंत्रनिकेतनाचे महाविद्यालय नसल्याने येथील विद्यार्थ्यांना फार दूरवर जाऊन विद्याभ्यास करणे भाग पडत होते. विद्यार्थ्यांच्या हिताचा व सर्वांगिण उन्नतीचा विचार करून 1984 साली वसई येथे पद्मश्री भाऊसाहेबांच्या आशिर्वादाने विद्यावर्धिनी तर्फे तंत्रनिकेतनाची स्थापना करण्यात माईंना यश आले. नंतर या डिप्लोमा कॉलेज बरोबरच अभियांत्रिकी महाविद्यालयाचीही स्थापना केली. नोव्हेंबर 1985 मध्ये अलाहाबाद येथे स्वातंत्र्य संनिकांचा राष्ट्रीय पातळीवर एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील एक हजार वृध्द स्वातंत्र्यसैनिकांना अलाहाबाद येथे नेण्याची व त्यांना सुखरूप घरी पोहोचविण्याची तारामाईंनी स्वीकारली व ती अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. कार्यकुशलता, स्नेहशिलता व महत्वाकांक्षा या जोरावर माईंनी खंबीर नेतृत्व केले आणि यातूनच 1985 साली माईंची पक्षश्रेष्ठींकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या चेअरमन पदी नियुक्ती झाली. नंतर 1992 साली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सभासद व त्यानंतर 1995 साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारी माईंवर सोपवून माईंच्या अतुलनीय कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आणखी अनेक महत्त्वाची पदे भुषविली. 1965 पासून त्या शिशूमंदिर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा होत्या. 1972 ते 1975 या काळात पश्चिम महाराष्ट्र महिला मंडळाच्या अध्यक्षा होत्या. अमेरिकेतील आरोग्य विषयक योजनांची पाहणी करण्यासाठी 1978 साली प्रतिनियुक्ती करण्यात आली. 1975 ते 1979 या काळात महाराष्ट्र जलप्रदूषण बोर्डाच्या कार्यकारी समितीच्या सभासद म्हणून त्यांनी काम पाहिले होते. याच काळात त्या केंद्रीय आणि राज्य समाज कल्याण मंडळाच्या सभासद होत्या. 1980 पासून त्या आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा होत्या. 1983 ते 1987 दरम्यान माईंनी महाराष्ट्र गोदाम महामंडळ, मुंबईच्या अध्यक्षा म्हणून पदभार सांभाळला होता. 1985 पासून वसई पॉलीटेक्निकच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. तसेच 1994 पासून विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, वसईचे अध्यक्षस्थान भुषविले. 1995 साली विद्यावर्धिनी कॉलेज, वसई च्या अध्यक्षा झाल्या. माईंनी आपल्यावर सोपविलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आणि आपल्या प्रत्येक भुमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला. अशा अत्यंत कष्टप्रद परंतू सार्थक अशा एका यात्रेचा गुरूवार दिनांक 29 मे 2008 या दिवशी समारोप झाला आणि प्रेरणामूर्ती शितल चांदण्याचा अस्त झाला. माईंच्या पूण्य स्मृतीस विनम्र अभिवादन आणि या महान व्यक्तिमत्त्वास शतशः प्रणाम !!!
No comments:
Post a Comment